मुंबई : कोरोना काळानंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी(नाणार)’ सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. ‘राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी,’ अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या समर्थनाचं स्वागत केलं आहे.
तर, शिवसेनेनं मात्र राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना काळात सामान्यांना ‘कृष्णकुंज’वर न्याय मिळतो अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळेच नाणार प्रकल्पाला विरोध असलेल्या स्थानिक नागरिकांना कृष्णकुंजवर बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्या ८ मार्च रोजी राज ठाकरे या नागरिकांची भेट घेणार असून ते त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असं सांगितलं जातंय.
फडणवीस सरकारच्या काळात स्थानिकांसह सत्तेतील शिवसेनेनं देखील या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यामुळे आजही हा प्रकल्प रखडला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी उद्धव ठाकरेंना प्रचार सभांमध्ये विदर्भातील जनतेला दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे. ही रिफायनरी विदर्भाच्या कल्याणासाठी विदर्भात हलवण्यात येईल असं उद्धव ठाकरे अनेकदा बोलले होते. याची आठवण करून देण्यासाठी आशिष देशमुख यांनी उद्धव ठाकरेंना स्मरणपत्र लिहिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- मोठी बातमी : आरक्षित गटातील उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनीच महापालिकेला घातला कोट्यवधींचा गंडा ?
- परिवर्तन बंगालमध्ये नाही तर दिल्लीत होणार; ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांवर पलटवार
- शेतीमालाच्या रक्षणासाठी एक नवी शक्कल; शेतकरी बनला स्मार्ट


