Share

‘पडद्यावर तो वावरताना आपल्यातला प्रत्येक माणूस स्वतःला त्याच्याशी एकरूप करू शकायचा’; राज ठाकरेंची इरफानला श्रद्धांजली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. बॉलिवूड अभिनेता इरफान खानची तब्येत अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. देशभरातील इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करतहोते मात्र अखेर इरफानची झुंज अपयशी ठरली आहे .

इरफान खान यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या फेसबुक पेजवर इरफानला श्रद्धांजली वाहिली आहे. इरफान लक्षात राहील कारण पडद्यावर तो वावरताना आपल्यातला प्रत्येक माणूस स्वतःला त्याच्याशी एकरूप करू शकायचा. ही एकरूपताच इरफानला दीर्घकाळ स्मरणात ठेवेल अश्या शब्दांत राज यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट

शरीर सौष्ठव, चकचकीत चेहरा, नृत्याचं अंग नसलं तरी पडद्यावर जे अंगविक्षेप केले जातील त्याला नृत्य म्हणणं आणि अतर्क्य दिसणाऱ्या, वागणाऱ्या खलनायकांना संपवण्यासाठी अतर्क्य गोष्टी करणाऱ्या बॉलिवूड मधल्या नायकांचा काळ सुरु असताना इरफान खान सिनेमात भूमिका मिळाव्यात म्हणून धडपडत होता.

त्याची अभिनयाची सहज-सुलभता नसिरुद्दीन शाह, ओम पुरी आणि अजून मागे गेलं तर बलराज सहानी ह्यांच्या पठडीतली. पण ९० च्या दशकात मुळात हिंदी चित्रपट आणि अभिनय ह्यांच्यात फारकत असण्याचा काळ होता. ह्या वावटळीत पण इरफान इथे टिकून राहिला.

पुढे नव्या शतकात सिनेमातले अतर्क्य खलनायक मागे पडले आणि माणसातील उणिवा, महत्त्वाकांक्षा, ह्याही माफक का होईना खलनायकी असू शकतात ह्याची जाणीव नव्या दिग्दर्शकांना होत होती आणि त्यातून इरफानची ‘मकबूलीयत’ सुरु झाली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या साचेबद्ध यशस्वी नटांच्या पठडीतलं आपल्याकडे काही नव्हतं ह्याची जाणीव इरफानला असावी आणि त्याची उणीव त्याने संवाद फेकीने, डोळ्यातून व्यक्त होण्याच्या ताकदीने भरून काढली. एखादं किडकिडीत व्यक्तिमत्व पण पडदा व्यापून टाकू शकतं, हे इरफानने दाखवून दिलं. सहज अभिनयाची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीत इरफानने प्रवाहित ठेवली.

इरफान लक्षात राहील कारण पडद्यावर तो वावरताना आपल्यातला प्रत्येक माणूस स्वतःला त्याच्याशी एकरूप करू शकायचा. ही एकरूपताच इरफानला दीर्घकाळ स्मरणात ठेवेल. माझ्या पक्षाची चित्रपट शाखा कलाकारांसाठी प्रामाणिकपणे काम करते, हेच इरफानना भावलं असणार आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा सदस्यत्व स्वीकारलं असणार. अशा ह्या चतुरस्त्र अभिनेत्यास आणि सहकाऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

—- राज ठाकरे

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!