🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांंनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनांमुळे जगभर एकच खळभर उडाली आहे. गुरुवारी सांयकाळी बालमोरल येथे राणीचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले असून, बकिंगहॅम पॅलेसने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची घोषणा केली आहे. एलिझाबेथ या सत्तर वर्षे ब्रिटनच्या सम्राज्ञी होत्या. त्या एकमेव होत्या की, त्यांनी ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळली. संपूर्ण जगभरातून राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली दिली आहे.
राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे.
ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.
कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ २ ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ २ ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल.
एलिझाबेथ २ ह्यांच्या स्मृतीस अभिवादन.
– राज ठाकरे
महत्वाच्या बातम्या :
- Video | शतकानंतर विराट कोहली भुवनेश्वरला म्हणाला, ” अभी क्रिकेट …”
- Ajit Pawar | अजित पवारांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन
- Chandrakant Patil | ‘बारामतीत सुप्रिया सुळेच निवडून येणार’ म्हणणाऱ्या अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- Ajit Pawar । पक्षाने तुम्हाला, तुमच्या पत्नीला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर द्या?; अजित पवारांचा बावनकुळेंना खोचक सवाल
- Yakub Memon | दहशतवादी याकूब मेमन पुन्हा जिवंत? शिवसेना-भाजप संघर्षात भर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
