🕒 1 min read
पुणे : पुणे महामेट्रोच्या कामामुळे मंगळवारपासून (31 डिसे.) पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बस नियमित वेळापत्रकानुसार वाकडेवाडी येथून सुटणार असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरून मेट्रो धावणार असल्याने, शिवाजीनगर बस स्थानक येथील जमिनीखालून मेट्रोचे स्थानक होणार आहे. या कारणामुळे हे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रोचे काम सुरु होण्यापूर्वीच वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्राच्या जागेमध्ये नवीन बस स्थानक उभारणीचा निर्णय घेण्यात आला. काही अडचणींमुळे कामास विलंब झाला असला तरी अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे.
सध्या शिवाजीनगर येथून सुमारे 1400 बस ये-जा करतात. औरंगाबाद, नाशिक, नगर, नागपूर, अमरावती, अकोला, गेवराई, बीड, लातूर, पणजी, यांसह विदर्भ व मराठवाड्यातील अनेक ठिकाणाहून धावणाऱ्या बस आता वाकडेवाडी स्थानकातून सुटतील. त्यानुसार वाकडेवाडी येथे एकूण 19 फलाट उभारण्यात आले आहेत. तसेच नवीन स्थानकात प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.
वाकडेवाडी येथील नवीन बस स्थानकामध्ये वर्कशॉपचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्व बस देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शिवाजी नगर येथील वर्कशॉपमध्येच येणार आहेत. तिथूनच या बस वाकडेवाडी स्थानकाकडे येतील. नवीन स्थानकातील वर्कशॉपचे काम पूर्ण होईपर्यंत सर्व एसटींना मोठा वळसा घालून शिवाजीनगर ते वाकडेवाडी हे अंतर पार करावे लागणार आहे.


