पुणे: देशात कोरोनाने शिरकाव केल्यापासूनच पुण्यावरील या रागाचे विघ्न काही केल्या कमी होत नव्हते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. तर एका बाजूला IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून चांगलेच राजकारण झाले होते. त्यामुळे त्या तात्काळ स्थगित कराव्या लागल्या होत्या.
आता, महाविकासआघाडी सरकारकडून शनिवारी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या IAS बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शेखर गायकवाड यांचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तर पीएमआरडीएच्या विक्रम कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.
शेखर गायकवाड यांची २२ जानेवारीला पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत महापौर आणि आयुक्तांमध्ये मतभिन्नता होती. परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोवर निर्बंध शिथिल करू नये, अशी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका होती.
रुग्णांना दाखल करायला जागा नसताना ‘विप्रो’ ने दिलेले आयते रुग्णालय पडले धूळखात !
तथापि आयुक्तांनी निर्बंध उठवत ९७ टक्के शहर ४ मे रोजी खुले केले होते. यानंतर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. एकंदरीतच ही सर्व परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यामुळे शेखर गायकवाड यांची पुण्याच्या आयुक्तपदावरुन गच्छंती झाल्याचे समजते. तर गायकवाडांसोबतच सौरभ राव यांची साखर आयुक्तालयातून पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी (विशेष ड्युटी) नियुक्ती करण्यात आली असून शेखर गायकवाड यांची नियुक्ती सौरभ राव यांच्या ठिकाणी साखर आयुक्तालयात करण्यात आली आहे.
तर, विक्रम कुमार यांना पीएमआरडीएच्या सीईओ पदावरून हटवून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. पुण्यातील कृषी विभागाचे आयुक्त असणाऱ्या सुहास दिवासे यांची पीएमआरडीएच्या सीईओपदी नियुक्त झाली आहे. जितेंद्र दुडी यांची सांगली जिल्हापरिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे नागरिकांचे हाल; भाजपच्या ‘या’ खासदारानी लॉकडाऊनला केला विरोध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

