औरंगाबादः कोरोना ने अनेकांचे धंदे व्यवसाय बुडवले. पण मिळेल त्या संधीचे सोने केले नाही, तर तो राजकारणी कसला? औरंगाबादला महानगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या. पण कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. ही परिस्थिती नगरसेवकांसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे.
मतदारांपर्यंत आपले काम जावे, यासाठी हे इच्छुक कामाला लागले आहेत. मग कुणी अन्नदान तर कुणी धान्याचे वाटप सुरू केले आहे. काहींनी तर कहर केला त्यांनी मोफत भाजीपाला पुरवण्याचा उद्योग सुरू केला आहे. हे सगळं कशासाठी तर समाजसेवा म्हणून नव्हे, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी या केलेल्या मदतीची जाण ठेवून मतदान करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. काहीजण विनाकारण पोलिसांना मदत केल्याचे दाखवत त्यांच्यासोबत हिंडत आहेत. वास्तविक लॉक डाऊन हे सगळ्यांनाच लागू आहे. फक्त परिस्थिती नियंत्रणात रहावी आणि लोकांनी घराच्या बाहेर पडू नये यासाठी पोलीस रस्त्यावर आहेत. त्याचाही फायदा घ्यायला हे राजकारणी विसरले नाहीत. मग काहींनी तर पोलिसांना केलेल्या अन्नदानाचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल केले.
तरी नशीब गेल्या तीन दिवसापासून वर्तमान पत्र बंद आहेत. नाहीतर या इच्छुक नगरसेवकांनी वर्तमानपत्रातील रकानेच्या रकाने भरून आपले कौतुक करून घेतले असते. आणखी काही दिवस हा अतिरेक औरंगाबाद करना सहन करावा लागणार आहे.
हेही पहा –


