🕒 1 min read
निलंगा,प्रतिनिधी: निलंगा तालुक्यात मागील काही दिवसापासून मटका,गुटखा,दारु,वाळू, प्रवाशी वाहतूक या अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची वेळोवेळी जनतेनी मागणी करुनही वरीष्ठ पोलिस प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याने जाणकारांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
तालुक्यात शहरासह, औराद व कासारसिरशी असे ३ पोलिस ठाणे कार्यरत आहेत. परंतु मागील काही दिवसापासून या तीनही पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये मटका,गुटखा,दारु,वाळू,अवैध प्रवासी वाहतूक या सारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळली असून या धंद्यांना ऊत आला आहे.
मटका,गुटखा व दारुचे व्यसन जडल्याने शहरासह ग्रामीण भागातील युवा पिढी मटका,गुटखा व दारुची कमालीची व्यसनाधिन झाल्याने युवा पिढीची ही वाढती व्यसनाधिनता एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे.राजरोसपणे चालणा-या अवैध धंद्यामुळे युवा पिढी अक्षरशः बरबाद होत आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असताना स्थानिक पोलिस माञ याप्रकरणी काहीही कारवाई करत नाही.अवैध धंदेवाले व स्थानिक पोलिस यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध जोपासले असल्याने पोलिसांचेच या अवैध धंदेवाल्यांना अभय आहे.पोलिसांचा आशीर्वाद असल्यामुळेच तालुक्यातील ही अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत.
११ डिसेंबर रोजी निलंगा येथे झालेल्या विकास कामाच्या आढावा बैठकीत औसा मतदार संघाचे आ.अभिमन्यू पवार यांनी निलंगा तालुक्यात समाविष्ट असलेल्या औसा मतदार संघातील ६८ गावांमध्ये चालू असलेल्या मटक्यासारख्या अवैध धंद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सदरील बैठकीतच संबंधित पोलिस अधिका-यांना दिले होते.
यापुढे आपल्या मतदारसंघात आपण अवैध धंदे अजिबात खपवून घेणार नाही असा सज्जड इशाराही त्यांनी पोलिसांना दिला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष विनायक बगदुरे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी विकास माने यांची भेट घेवून तालुक्यात राजरोसपणे चालू असलेल्या या धंद्यांबद्दल नाराजी व्यक्त करुन याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहर व परिसरात चालू असलेली अवैध धंदे तत्काळ बंद करावी अन्यथा मनसेच्यावतीने शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.तर नुकतच काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके,जि.प.माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील व तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी बोरसुरी येथील अवैध दारु विक्रेत्यांच्या विरोधात कठोर कारवाई करुन या अवैध दारु विक्रीस संबंधित पोलिस अधिका-यास जबाबदार धरुन त्या पोलिस अधिका-यावर कठोर कारवाई करावी अन्यथा पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
बोरसुरी गावात राजरोसपणे विक्री होणा-या या अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी ३-४ दिवसापूर्वीच बोरसुरी येथील तब्बल १०० -१५० महिला तडक येथील उपविभागीय अधिकारी गाठून आपल्या न्याय मागणीसाठी चक्क ठिय्या आंदोलन केले.शहरासह तालुक्यात चालू असलेल्या या अवैध धंद्याच्या विरोधात लोकप्रतिनिधीसह महिलांनी मागणी मागील अनेक दिवसापासून लावून धरुनही पोलिसांकडून काहीही कारवाई होत नाही? मटका,गुटखा,दारु आदी अवैध धंदे बिनबोभाटपणे चालू असतानाही वरिष्ठ पोलिस प्रशासन देखील या संवेदनशील प्रकरणी काहीही ठोस कारवाई करण्यास धजत नसल्याने जाणकारांमधून उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

