मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले, या रोगाच्या प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे. म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या नागरी भागात 144 कलम नाइलाजास्तव लावत आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,कृपाकरून 5 पेक्षा अधिक जण एकत्र येऊ नका. गर्दी करू नका, टोळकं किंवा ग्रुपनं कुठे फिरू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. परदेशातून आता आपल्याकडे कोणी येणार नाही. आता आपले आपणच आहोत. आपल्यालाच या संकटावरती मात करायची आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. अहवालानुसार हा विषाणू 170 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे तीन लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. भारतातही त्याच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत 341 लोकांमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे.
दरम्यान, आता हे १४४ कलम लागू झाल्यानंतर रेल्वे , खासगी बसेस , एस टी बसेस बंदहोणार आहेत.जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील.अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील.
बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील.शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करण्यात आली आहेत.ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
चाचणी केंद्रे वाढवली जाणार असून ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल असं ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी प्रार्थना स्थळे बंद असणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

