पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले, या रोगाच्या प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे. म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या नागरी भागात 144 कलम नाइलाजास्तव लावत आहे.
दरम्यान, राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आ. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करून नागरिकांना स्वयंशिस्तीने वागण्याचे आवाहन केले आहे. १४४ कलम लागू केलं म्हणजे कोणताही प्रश्न सुटत नसतो, तर नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळून कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन घरातच थांबणं गरजेचं आहे. गर्दी होऊ नये म्हणून मी माझे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तसे तुमचेही काही नियोजित कार्यक्रम असतील तर तेही रद्द करण्याचा प्रयत्न करा किंवा पुढे ढकला असे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट
https://www.facebook.com/RohitPawarOfficial/posts/884938791969864
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शहरी भागात जमावबंदी (कलम १४४) लागू केलीय. अशा परिस्थितीत डॉक्टर, नर्स, पोलीस आणि प्रशासन मात्र अहोरात्र काम करतायेत. कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी आज पहाटे मतदारसंघात जाऊन आलो. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयालाही भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार, बीडीओ, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, डॉक्टर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नर्स या सर्वांची भेट झाली. त्यांच्यासोबत चर्चा करुन कर्जत-जामखेडमधील आरोग्य सुविधेचा आढावा घेतला.
कर्जत-जामखेडला आरोग्य सेवा पुरविण्यात डॉ. आरोळे हॉस्पिटलचा मोठा वाटा आहे. म्हणूनच त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा दरवळ अगदी परदेशापर्यंत पोहचला आहे. कोरोनाच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी या हॉस्पिटलने घेतलेला पुढाकार पाहून खूप समाधान वाटलं.
दरम्यान, मतदारसंघात पोलीस, महसूल व आरोग्य या सर्व यंत्रणा हातात हात घालून काम करत असल्याचं पाहून समाधान वाटलं. पण या प्रयत्नांना आता नागरिकांच्या सहकार्याचीही तेवढीच साथ पाहिजे. फक्त १४४ कलम लागू केलं म्हणजे कोणताही प्रश्न सुटत नसतो, तर नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळून कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन घरातच थांबणं गरजेचं आहे. गर्दी होऊ नये म्हणून मी माझे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तसे तुमचेही काही नियोजित कार्यक्रम असतील तर तेही रद्द करण्याचा प्रयत्न करा किंवा पुढे ढकला. या सगळ्याच गोष्टींसाठी नागरिका सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे. शेवटी हे काम कोणत्याही एकट्याचं नाही तर आपण सर्वांनी मिळून करायचं आहे.
तसंच आता लोकांचं प्रबोधन होणंही गरजेचं आहे. कोरोनाचा विषाणू हा बाहेरच्या देशातून आल्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. अशा लोकांनी पंधरा दिवस घरातच वेगळं राहावं आणि घरातील इतरांनीही त्यांना एकटं वाटेल अशी वागणूक देऊ नये. पुण्या-मुंबईसारख्या गर्दीच्या शहरातून गावाकडे आलेल्यांनीही काही दिवस वेगळं राहावं आणि आजारी असल्यास डॉक्टरांकडे जावं. या सगळ्याच बाबतीत मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हीही शक्य तेवढ्या लोकांना, मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांना याबाबत अवश्य माहिती द्या. जागरुक करा.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

