नागपूर : काही दिवसांपासून विनाअनुदानित शाळांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहे. कोरोना काळात या शाळांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत द्यावी. उर्वरित ७५ टक्के शुल्क हे टप्प्याटप्प्याने घ्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी व शिक्षण उपसंचालकांनी विनाअनुदानित शाळांना करावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
खासगी शाळांच्या वाढीव शुल्का विरोधात विद्यार्थी आणि पालकांचे एक शिष्टमंडळ नुकतेच गडकरी यांना भेटले होते. त्यावेळी पालकांनी ५० टक्के शुल्कमाफीची मागणी केली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गडकरी यांच्या निवासस्थानी काल रविवारी बैठक झाली. कोरोना काळात शाळा बंदच होत्या. त्यामुळे शैक्षणिक शुल्कात सवलत हवी अशी भूमिका पालकांची आहे.
तर शाळा बंद असल्या तरी शिक्षकांचे पगार व शाळांचा अन्य खर्च सुरू होता, याकडे शाळा संचालकांनी लक्ष वेधले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य पालकांची एकरकमी शैक्षणिक शुल्क भरण्याची परिस्थिती नाही. अशावेळी शाळांचे व्यवस्थापन पालकांशी उर्मटपणे वागते अशा स्वरूपाच्या तक्रारी पालकांनी केल्या.
दोन्ही गटाच्या बाजू ऐकूण गडकरी म्हणाले, महामारीमुळे सर्वच क्षेत्र कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करीत आहे. बसचालकांची स्थितीही चांगली नाही. त्यांनी बसेस कर्जावर घेतल्या. पण कर्जाचे हप्ते भरू शकत नाही. अशा स्थितीत यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. याप्रसंगी ७५ टक्के शुल्क हे शाळांनी टप्प्याटप्प्याने स्वीकारावे, अशी सूचना पालकांकडून आली. ती शाळा संचालकाकडून मान्य करण्यात आली. शाळा चालकांच्या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याची सूचनाही गडकरी यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
- उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर, साताऱ्यात; पूर परिस्थितीचा आढावा घेणार
- मुख्यमंत्री ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्तांशी साधणार संवाद


