सांगली : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. या कुटुंबातील चौघांना हज यात्रेवरून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात २५ मार्च सकाळी ११.३० पर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११२ वर पोहोचली.
हे कुटुंब इस्लामपूरमधील आहे. महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये आणखी पाच जणांची भर पडली आहे.
इस्लामपुरातील या कुटुंबातील आधी चौघांना कोरोना लागण झाल्याची माहिती दोन दिवसापूर्वी समोर आली होती. हे चारही जण नुकतेच सौदी अरेबियातून आले होते. ते हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते. संबंधित कोरोना बाधित रुग्णांना सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्या चौघांचे कोरोना अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या सर्वांवर मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

