सोलापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने अनगरकरांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठी समोर निर्माण झाला आहे. अशातच युवक कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीवरून लोकनेतेचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या विचारांना मानणाऱ्या या मतदारसंघात बाळराजेंची एन्ट्री झाल्याने सर्व पक्षीय राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे बार्शी चे राजकारण नवे वळण घेण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेतेमंडळी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यामुळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशातच प्रामाणिकपणा आणि पक्षनिष्ठा साठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या अनगरकर पाटील पिता-पुत्रांनी कंबर कसत मोहोळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवला. या निवडणुकात बाळराजे पाटील यांनी जिल्हाभर केलेले प्रचार दौरे, प्रचार सभांमुळे जिल्ह्यातील युवक वर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित झाला. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणात तरुण चेहरा म्हणून बाळराजे पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. अशातच विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते दिलीपराव सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेकडून बार्शी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र या मतदारसंघात अनगरकर पाटील पिता-पुत्रांना मानणारा मोठा वर्ग असल्याने राष्ट्रवादीच्या नवख्या उमेदवाराला देखील चांगले मताधिक्य मिळाले. परिणामी दिलीपराव सोपल यांना पराभवाची चव चाखावी लागली होती.
भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांना कोरोनाची लागण
मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने बाळराजे पाटील यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी युवक कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे बाळराजे पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बार्शी मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली असल्याचे समजते. जिल्हा परिषद निवडणुका संपूर्ण राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार म्हणून बाळराजे पाटील यांनी रेकॉर्ड निर्माण केला आहे. शिवाय तरुण वर्गात त्यांची चांगलीच क्रेज आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना जि. प. शिक्षकांचा ड्रेस कोड आणि कर्मचाऱ्यांना लावलेली शिस्त लावली. त्याच प्रमाणे त्यांनी राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते उत्कृष्ट व्यवस्थापन करुन संपूर्ण जिल्ह्याला आपल्या नेतृत्वाची धमक दाखवली आहे.
येणाऱ्या काळात बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी मध्ये निर्माण झालेली पोकळी, उद्योग व्यवसायात तालुक्याची झालेली वाताहात, बार्शी तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगार असणाऱ्या युवकांसाठी बाळराजे पाटील आशेचा किरण ठरू शकतात. त्यांच्या रूपाने बार्शीच्या राजकारणात सक्षम पर्याय निर्माण होऊ शकतो अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाळराजे पाटील यांची बार्शी एन्ट्री भल्याभल्या मातब्बर राजकारण्यांच्या उरात धडकी भरवू शकते हे मात्र नक्की.
अहमदनगरमध्ये शंकरराव गडाख घडवणार राजकीय भूकंप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

