टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषीत अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाषावार प्रांतरचनेदरम्यान कर्नाटकात अडकलेल्या मराठी भाषिकांना आणि हा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला असे ते म्हणाले होते. यावर आता प्रतिक्रया येण्यास सुरवात झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचार होत आला आहे. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. त्यानंतर कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी त्यावर प्रतिक्रया दिली आहे ते म्हणतात, “भीमाशंकर पाटील या संकुचित प्रवृत्तीचा मी ncp च्या वतीने तीव्र निषेध करतो. भारत एक राष्ट्र आहे हे कदाचित त्याला माहिती नसावे. महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही सरकारने याची गंभीर दखल घेणे आवश्यक असून अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.
पुढे ते म्हणतात, “कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याने भीमाशंकर पाटील बोलत असावा अशी शंका आहे. ही प्रांतवादी भूमिका राज्यघटनेच्या विरोधात आहे. महाराष्ट्र्र एकीकरण समितीशी केंद्र सरकारने चर्चा करायला हवी. भाजप पुढाकार घेईल ही अपेक्षा आहे”.
आज कोल्हापूर येथील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. थेट महाराष्ट्र कर्नाटक महामार्गावर भीमाशंकर पाटलांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तिरडी काढून दहन करत निषेध नोंदवला. तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना आपला पाठींबा असल्याचे यावेळी सांगितले.


