🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर पीएसआय ‘एसटीआय आणि एएसओ पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात राज्य सरकार PSI च्या ६०५ जागा भरणार असल्याचे नमूद केलं आहे. त्यानुसार NT प्रवर्गासाठी साडेतीन टक्क्याने २२ जागा असणं गरजेचं आहे. पण त्यात फक्त २ जागा NT प्रवर्गासाठी दिल्या आहे. त्यामुळे उरलेल्या २० जागा कुठे गेल्या? असा प्रश्न भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. जर पुन्हा अशी अफरातफर झाली तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची गाढवावर बसून धिंड काढू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे चोरी झालेल्या २० जागा द्या, अशीही मागणी पडळकरांनी केली आहे.२०१० ते २०१९ पर्यंत NT च्या २९३ जागा भरायच्या होत्या. त्यापैकी २०० चं जागा भरल्या. उरलेल्या ९३ जागा चोरीला गेल्या आहेत, असेही पडळकर म्हणाले.
याबाबत सरकारने सुधारित जाहिरात काढा, त्यानंतरच परीक्षा घ्या. जर सुधारित जाहिरात काढली नाही तर आम्ही महाराष्ट्रात परीक्षा होऊ देणार नाही अशी भूमिकाही पडळकरांनी घेतली आहे.


