औरंगाबाद : शहरात दररोज हजारांच्या घरात रुग्णसंख्या निघत आहे. संपूर्ण शहरच हॉटस्पॉट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असतांना अजूनही शहरातील नागरिक कोरोनाला गंभीरतेने घ्यायला तयार नाही. शहरात शनिवार रविवार कडक लॉकडाऊन असतांना देखील अनेक जण मोठ्या प्रमाणावर बाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे.
क्रिडा मैदान, जलतरण तलाव यांना जिल्हा प्रशासनाने बंदी घातलेली असतांनाही मैदानावर होणाऱ्या प्रचंड गर्दीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बंदी असतांनाही रविवारी (दि.४) सकाळी आमखास मैदानावर शेकडो जणांच्या जमावाने कडक लॉकडाऊनच्या आदेशांना मैदानावर टांगलेले पाहायला मिळाले. त्यामुळे आम खास मैदानावरील शेकडोंचा ‘मॉब’ पाहून कडक लॉकडाऊन निव्वळ ‘ख्वाब’ तर नव्हे ना असा प्रश्न उपस्तीथ होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते चार एप्रिल दरम्यान अंशत: लॉकडाउन जाहीर केले होते. दररोज रात्री आठ ते सकाळी सहापर्यंत सर्व व्यवहार बंद आहेत. दर शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार पूर्णत: बंद ठेवले जात आहेत. मात्र या संपूर्ण काळात नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही.
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी वारंवार रात्रीच्या वेळी शहरातील वेगवेगळ्या भागात धाड टाकत अनेकांवर स्वतः कारवाई केली आहे. मात्र रात्री कारवाईचा बडगा उचलणारे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त दिवसा ढवळ्या गेले कुठे? असा प्रश्न आमखास मैदानावरील परिस्थिती पाहून उपस्थित होत आहे.
रविवारी सकाळी शहरातील आमखास मैदानावर जवळजवळ तीनशे ते चारशे जणांचा जमाव जमलेला होता. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने चित्रपटगृह, जलतरण तलाव, जीम, उद्याने, मैदाने यांवर पूर्णत: बंदी आणली आहे. मात्र असे असतांनाही जिल्हाधिकारी, मनपा आणि पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानापासून जवळ असलेल्या आमखास मैदानावर शेकडो तरुण विनामास्क क्रिकेट खेळत असल्याचे दिसून आले. यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोण पुढाकार घेईल हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो.
महत्त्वाच्या बातम्या
- तब्बल सात वर्षापासून रखडलेली ग्रामीण रुग्णालयाची कामे होणार कधी?
- आधी रोजगाराचे पैसे खात्यात जमा करण्याची मागणी करणाऱ्या चव्हाणांची वीकेंड लॉकडाऊनवर प्रतिक्रिया
- गृहमंत्रीपदासाठी हसन मुश्रीफ याचं नाव आघाडीवर, मुश्रीफ तातडीने मुंबईकडे रवाना
- ‘सचिन वाझेला पाठीशी घालणारा एक नेता मंत्रिमंडळातून कमी झाला’
- लढवय्या दिपाली चव्हाणला त्रास देताना नराधम शिवकुमारने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या

