टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच राष्ट्रवादीला अजून एक मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गोरठेकर हे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि तितकेच ताकदवान नेते आहेत. राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यासोबत कोणत्याही पक्षात जाण्यास समर्थक तयार आहेत.

बापूसाहेब गोरठेकर यांनी समर्थकांचा मेळावा घेतला. त्यात त्यांच्या समर्थकांनी भाजपात जाण्यासाठी आग्रह केला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.


