टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. आता अश्या गरीब गरजू व्यक्तींसाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाचे राज्यातील सर्व लोक प्रतिनिधी एका महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ आणि राष्ट्रीय पातळीवरील लोक प्रतिनिधी आपले वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’मध्ये जमा करणार आहेत असे पत्रक काढले आहे.
काय आहे पत्रकात –
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे.
एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’साठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत.
– शरद पवार
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

