टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे या यात्रेचे पोस्टर जरी करण्यात आले आहे. ६ ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे. खासदार अमोल कोल्हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाची मोठी जबाबदारी आहे, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. त्यामुळे या यात्रेची जबाबदारी कोल्हे यांच्या खांद्यावर आहे.

या यात्रेद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. तसेच सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या या यात्रेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘महाजनादेश यात्रे’वर आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ही यात्रा असणार आहे.


