टीम महाराष्ट्र देशा : खा. नारायण राणे यांनी ‘नो होल्ड्स बार्ड’ या नावाने आपले इंग्रजी आत्मचरित्र लिहिले. त्याचे प्रकाशन एप्रिल महिन्यात झाले होते. आत्मचरित्राची मराठी आवृत्ती ‘झंझावात’ या नावाने तयार करण्यात आली. या मराठी आत्मचरित्राचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नितीन गडकरी आणि शरद पवार यांनी नारयण राणे यांचा त्यावेळी पक्षांतराचा निर्णय चुकला, असे प्रतिपादन केले. नारायण राणेंनी कॉंग्रेसमध्ये न जाता शिवसेनेतचं राहिले असते तर बर झालं असत, असे नितीन गडकरी म्हणले. तर शरद पवार यांनी देखील नारायण राणेंच्या पक्षांतरावर भाष्य केले.
पवार म्हणाले की, नारायण राणे यांचा स्वभाव अन्याय सहन करणारा नाही. त्यामुळे शिवसेनेत त्यांची प्रचंड कोंडी होत असल्याने ते अस्वस्थ होते आणि त्यामुळेचं त्यांनी शिवसेना सोडली. खरे तर त्यांच्या शिवसेना सोडण्यामागची आतील गोष्ट मला माहीत आहे. मात्र, मी ती सांगणार नाही. शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेस की राष्ट्रवादीत प्रवेश करायचा यासाठी त्यांनी दोन चिठ्ठ्या तयार केल्या, त्यातील जी चिट्ठी उचलली ती काँग्रेसची निघाली. मात्र, त्यांची ही चूक होती की घोडचूक याबाबत मी काही बोलणार नाही.
दरम्यान नारायण राणे यांच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी नारायण राणे यांच्याबरोबर आठवणींना उजाळा दिला.

