टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचार होत आला आहे. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. त्यानंतर कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केले. यावर महाराष्ट्र सीमाप्रश्न लढ्याचे झुंजार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सीमाप्रश्नांच्या लढ्यात मी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तुरुंग आतून आणि बाहेरून बघितले आहेत. त्यामुळे कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या (कनसे) अध्यक्षाने दिलेल्या धमकीला आम्ही भीक घालत नाही, असे म्हणत त्यांनी कनसेला धुडकावून लावले आहे.
ते म्हणाले की, हा ‘कनसे’ वाला कोण आहे. याच नाव मी आजच ऐकतोय. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न न्यायालयात आहे हे त्याला माहिती नाही का? त्यामुळे अशा पोकळ धमकीला आम्ही भिक घालत नाही. असे पाटील म्हणाले. तसेच ज्यावेळी ही लढाई सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रातील नेत्यांनी कसलीही पर्वा न करता या लढाईत बेधडकपणे उडया घेतल्या होत्या. आजही आम्ही लढत आहोत, असे एन. डी. पाटील म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

