मुंबई : ‘देशात एकीकडे आर्थिक घसरण थांबत नाही. बेरोजगारी वाढली असताना हे लोक आपले पाप लपवण्यासाठी जातीय दंगली घडवून आणत आहेत. २००२ मध्ये जे मॉडेल राबवले गेले तेच आता दिल्लीत राबवले जात असल्याचाही आरोप,’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.
चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातील सकाळच्या सत्रात अव्हाड बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.
‘दिल्लीत सत्ता मिळाली नाही म्हणून देशाच्या राजधानीचा चेहरा विकृत करण्याचे काम अमित शाह आणि मोदी यांनी केले, असा आरोप आव्हाड यांनी केला. तसेच दिल्लीच्या दंगलीवर देशाचे गृह मंत्री अमित शाह यांनी एकही शब्द न काढणे ही क्रूरता आहे, आजपर्यंत दिल्लीतील दंगलीत ४२ लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे, शहा यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, एसआरए आणि म्हाडाचे सुयोग्य नियोजन करून गोरगरिबांना घरे मिळावीत म्हणून मला पवार साहेबांनी जबाबदारी दिली. त्यामुळे, नागरिकांच्या प्रश्नासाठी मी मुंबईत कुठेही यायला तयार असल्याचे आश्वासन आव्हाड यांनी दिले.


