मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध मनसेनं मोर्चा काढला होता. पण आता याच मनसेच्या कार्यालयाबाहेर फेरिवाले बसण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं आखलेल्या नव्या फेरिवाला धोरणात मनसेच्या दादरमधील राजगड या कार्यालयाबाहेरील जागा फेरिवाल्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
तसेच नव्या धोरणानुसार राजगडाबाहेर १०० फेरिवाल्यांना बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता हा निर्णय झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात आज मनसेकडून पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डवर मोर्चा काढला जाणार आहे. मनसेने पालिकेच्या या निर्णयाचा विरोध केला असून रहिवासी परिसरात फेरीवाले बसू देणार नाही असा इशारा दिला आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी करत विराट मोर्चा काढणार्या मनसेच्या ‘राजगड’ कार्यलयाखालीच महापालिकेने फेरीवाल्यांना बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राजगड असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्क्वेअर फुटपाथवर तब्बल 100 फेरीवाले बसवले जाणार असल्याचा निर्णय पालिकेने घेतला. पालिकेच्या याच निर्णयाविरोधात मनसे मोर्चा काढणार आहे.
दरम्यान, महापालिकेने आखलेल्या फेरीवाला धोरणानुसार दादर, माहिम आणि जी/उत्तर विभागामध्ये 14 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या 14 रस्त्यांवर एकूण 1 हजार 485 फेरीवाले बसविण्यात येणार आहेत. तसेच दादरमधील शारदाश्रम शाळेजवळील बाबुराव परुळेकर मार्गावरही 50 फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
