मुंबई : आगामी राजकीय धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवार 23 रोजी मुंबई येथे कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा लाभ उठवण्यासाठी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे.
शिवसेनेच्या नव्या राजकारणामुळं अस्वस्थ असलेल्या हिंदुत्ववादी व मराठीप्रेमी शिवसैनिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मनसेनं सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मनसेच्या नेत्यांनी शिवसैनिकांना साद घातली आहे. बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, मनसेचा झेंडा हाती घ्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मात्र आता मनसेच्या अधिवेशन काळात या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पाहता येवू नये म्हणून राज्यभरातील बत्ती गुल करण्यात येणार असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. मेंटेनन्स च्या कारणामागे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटल आहे. महावितरणच्या वतीने पाठविण्यात आलेल्या काही मेसेजेसच्या आधारे त्यांनी हा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
मुंबईतील गोरेगाव इथं मनसेचा महत्त्वाचा मेळावा होणार आहे. यात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका जाहीर करणार आहेत. मनसेचा नवा ध्वजही या मेळाव्यातून पुढं आणला जाणार आहे. राज ठाकरे हे मराठीचा मुद्दाच पुन्हा लावून धरतात की भाजपला सोयीस्कर अशी हिंदुत्वाची भूमिका घेतात, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
