टीम महाराष्ट्र देशा : चिपळूणमधील तिवरे धरणाच्या दुर्घटनेवरून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सवाल केला आहे. तिवरे धरणाच्या दुर्घटनेला जबाबदार कोण? आणि जलसंपदामंत्री या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करणार का? असा सवाल मनसेने केला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर आॅकाउंट वरून हा सवाल करण्यात आला आहे.
काल ( २ जुलै, मंगळवार ) रात्री नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं. यामध्ये २४ जण वाहून गेले. आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेला १२ तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण फुटल्यानं १३ घरं वाहून गेल्यानं वित्तहानीदेखील झाली.
दरम्यान अतिवृष्टीमुळे तिवरेधरण ओसंडून वाहू लागलं, त्यामुळे धरण फुटलं अशी माहिती समोर आली आहे. पण मुळात धरणाची डागडुजी नियमितपणे होत होती का?, असा सवाल मनसेने केला.
इतकेच नव्हे तर धरणातील गाळ कधी काढला गेला? आणि ह्या प्रकाराला नक्की जबाबदार कोण? ह्याची चौकशी करून जलसंपदामंत्री संबंधितांवर कडक कारवाई करणार का?, असा सवालही मनसेने केला.
अतिवृष्टीमुळे #तिवरेधरण ओसंडून वाहू लागलं त्यामुळे धरण फुटलं अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण मुळात धरणाची डागडुजी नियमितपणे होत होती का? धरणातील गाळ कधी काढला गेला? आणि ह्या प्रकाराला नक्की जबाबदार कोण ह्याची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई जलसंपदामंत्री महोदय करणार का? pic.twitter.com/csvqi4gjbE
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 3, 2019


