मुंबई : कुठलीही गोष्ट लादून होत नसते. उद्या मी माझ्या मुलाला राजकारणात आणलं. किंवा इतर कोणी त्यांच्या मुलाला किंवा मुलीला आणलं. तरी तुम्ही केवळ त्यांना राजकारणात आणू शकता. मात्र मान्य करायचं की नाही हे जनतेवर असतं,’ असं मत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडले.
मुंबईमध्ये ‘अपना सहकारी बँक’ लिमिटेड प्रस्तुत महाराष्ट्र टाइम्स ‘कलासंगम २०२०’ या तीन दिवसांच्या साहित्य व सांस्कृतिक सोहळ्याचा समारोप रविवारी राज यांच्या मुलाखतीने झाला. ‘जोशी एंटरप्रायझेस’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ आपल्याला सगळ्या गोष्टींकडे जातीच्या चष्म्यातून बघण्याची सवय लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, शिवाजी महाराज मराठ्यांचे …याच नजरेतून या महापुरुषांकडे आपण बघत आहोत. जातीच्या आधारावर राजकारणी सर्वसामान्यांना वापरून घेत आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. हा महाराष्ट्र जातीच्या बाहेर बघणार की नाही,’ असा करडा सवाल करीत, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित होते.
दरम्यान, व्यंगचित्रकला, व्यंगचित्र सुचणे ते साकारण्याची प्रक्रिया, व्यंगचित्रांसाठी आवश्यक असणारी उपजत विनोदबुद्धी, चित्रकला, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील दिवस, डेव्हिड लो ते आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा प्रभाव, परदेशातील कलाकार, वास्तू सौंदर्य, आवडते कलाकार, संगीतकार, त्या संगीतकारांचे मर्मस्थान… असे विविध पदर राज यांनी या मुलाखतीत उलगडले.


