🕒 1 min read
मुंबई : पुनश्:च हरिओम करत राज्यात ३ जुनपासून ‘मिशन बिगीन अगेन’ची सुरुवात होत असून टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथील करत आहोत,एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतू ही वाट अत्यंत निसरडी आहे. ती चालतांना आपल्या सर्वांना एकमेकांचे हात हातात धरून अतिशय जबाबदारी आणि खबरदारीने पुढे जायचे आहे. एकदा सुरु केलेले व्यवहार पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, त्यासाठी स्वंयशिस्त, जिद्द आणि संयम कायम ठेवत वाटचाल करतांना देशापुढे महाराष्ट्राचा आदर्श प्रस्थापित करावयाचा आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाऊन हळुहळु शिथील करतांना ३,५ आणि ८ जुन च्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टीची शिथीलता देण्यात आली आहे याची माहिती यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्री वादळ धडकण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे तसेच शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगतांना अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबतची माहितीही दिली. आज फेसबूक लाईव्ह च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
गर्दी करू नका- संयम आणि शिस्त पाळा
पहिल्या टप्प्यात ३ जूनपासून खासगी आणि सार्वजनिक मैदांनांवर, समुद्र किनाऱ्यांवर सायकलिंग, जॉगींग आणि धावणे-चालणे या गोष्टींला मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत कोणत्याही सामुहिक कृतीला मान्यता नाही. ५ जूनपासून दुकाने आणि ८ जूनपासून १० टक्के कर्मचारी असलेली खासगी कार्यालये उघडली जातील अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत, आपल्याला कुठेही गर्दी करून सुरु झालेल्या गोष्टी बंद करावयाच्या नाहीत. याची काळजी प्रत्येकाने घेऊनच घराबाहेर पडायचे आहे, स्वच्छता आणि स्वंयशिस्त पाळायची आहे. मास्क वापरणे चेहऱ्याला हात न लावणे, शारीरिक अंतर ठेवणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे असेही ते म्हणाले.
मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये
मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंधुदूर्गपासून मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांनी काळजी घेण्याचे, समुद्रात न जाण्याचे आवाहन केले. हे वादळ येण्याची शक्यता असून ते दिशाही बदलू शकते परंतू तरीही त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सर्व सेमिस्टरचे सरासरी गुण लक्षात घेऊन मार्क्स देणार
आपण टप्प्या टप्प्याने सर्व गोष्टी उघडू, त्यासाठी घाई नाही हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, आता पावसाळा सुरु होतोय, त्याची काळजी घेतांना यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. हा शिक्षणाचाही काळ आहे. त्याकडे लक्ष देतांना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेचा निर्णय काळजीपूर्वक आणि चर्चे अंती घेतला गेला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देऊन पास करावयाचा आणि त्यांचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ज्यांना हे मान्य आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. ज्यांना वाटते की परिक्षा दिल्यानंतर मी यापेक्षा अधिक चांगले मार्क्स मिळवू शकलो असतो त्यांच्यासाठी पुढे काही कालावधीने परिक्षा घेतल्या जातील हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य
शाळेपेक्षा शिक्षण सुरु करण्याला प्राधान्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण-शहरी भाग, ग्रीन झोन सह राज्यात सुरु करावयाच्या शिक्षणासाठीच्या उपाययोजनाचे शासनाचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्ष जिथे शाळा सुरु करता येतील तिथे शारीरिक अंतराच्या व इतर उपाययोजनांसह शाळा सुरु करणे, जिथे हे शक्य नाही तिथे ऑनलाईन शाळा सुरु करणे, टॅब, लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण देणे याबाबत येत्या काही दिवसात ठोस निर्णय घेतला जाईल हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मान्यता
राज्यात ३ तारखेपासून काही गोष्टी सुरु करावयास परवानगी देण्यात आली असली तरी गर्दी करण्यास, सभा-समारंभ आणि उत्सव करण्यास अजूनही परवानगी नाही. शारीरिक अंतर हे ठेवावेच लागेल. हेच अंतर आपल्याला कोरानापासून दूर ठेवणार असल्याचेही ते म्हणाले. आता देण्यात आलेल्या सर्व मान्यता या काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात आल्या आहेत, त्याचे पालन करावे लागेल. झुंबड करून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पहाटे पाच पासून सायंकाळी ७ पर्यंत असे व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाले.
वृत्तपत्रे घरपोच
पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच देतांना वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरूणांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे व त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात फक्त ३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण
मुख्यमंत्र्यांनी आजघडीला राज्यात ६५ हजार कोविड रुग्ण असून त्यातील २८ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याचे व प्रत्यक्षात ३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे स्पष्ट केले. या ३४ हजार रुग्णांमध्ये २४ हजार रुग्ण असे आहेत ज्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही, औषोधोपचाराची गरज नाही. पण ते क्वारंटाईन आहेत. मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ९५०० आहे. १२०० रुग्ण गंभीर असून त्यापैकी फक्त २०० जण व्हेंटिलेटरवर आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असं म्हणणाऱ्यांसाठी ही आकडेवारी बोलकी आहे हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच महाराष्ट्राला विनाकारण बदनाम केले जात असल्याबद्दल दु:ख वाट असल्याची खंत ही व्यक्त केली.
मी स्वत: सभ्य आहे, याबाबतीत फक्त स्वत:चीच गॅरंटी घेऊ शकतो, पवार-राणे वादावर विखेंचा टोला
ट्रम्प यांच्या मागणी नंतर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी वाढली
मोठी बातमी : वाचा पाचव्या लॉकडाऊनमध्ये काय होणार सुरु…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
