🕒 1 min read
पुणे : कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून मार्केट यार्डातील विविध विभागातील गर्दी कमी झाली आहे. बाजारात रविवारी साधारणतः २५ टक्क्यांनी गर्दी कमी झाली आहे. यामुळे फुलं, फळे आणि भुसार बाजारातील बहुतांशी खाद्य पदार्थांचे भाव २० ते ५० टक्क्यांनी कमी झाले असल्याची माहिती बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. तर तरकरी विभागात फळभाज्यांना आणि पालेभाज्यांना तुलनेने मागणी चांगली आहे.
फळ बाजारातील पेरु, कलिंगड, खरबूज, लिंबे आणि सफरचंदाच्या भावात घट झाली आहे. तर भुसार विभागात किराणा भुसार मालाची मागणी घटलेली पाहवयास मिळत आहे. यामुळे शेंगदाणे, बेसन, भाजकी डाळ, रवा, मैदा, आटा, साबुदाणा, सोयाबीन, पाम आणि सूर्यफुल तेलाचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत घटले असल्याचे भुसार व्यापाऱ्यांनी सांगितले. रविवारी खरेदीदार आणि विक्रेत्यांची बाजारात गर्दी असते. परंतु कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची तुलनेने गर्दी कमी झाली आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपासून फुलबाजारात मंदिचे सावट असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूंमुळे फुल बाजारात ग्राहकांची संख्या घटली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. ग्राहकांची सख्या ३० टक्के पर्यंत कमी झाली आहे. यामुळे भावात मोठी घासरण झाली असल्याचे फुल बाजार संघटनेचे अध्यक्ष अरुण विर यांनी सांगितले.
बाजारातील तरकारी विभागात फळ भाज्यांना आणि पालेभाज्यांना तुलनेने मागणी चांगली आहे. हा माल अत्यावश्यक आहे. यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भाज्यांना मागणी स्थिर आहे. शासनाने मॉल बंद करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे मॉल चालकाकडून होणारी खरेदी देखील बंद झाली आहे.
हॉटेल व्यासायिकांकडून होणारी मागणी कमी झाली आहे. तसेच बाजारातून माल खरेदी करून तो निर्यात करणारे अनेक व्यापारी आहेत. परंतु सध्या अनेक देशातील निर्यात बंद आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही मागणी कमी झाली आहे. यामुळे बाजारात तुलनेने २०-२५ टक्क्यांनी गर्दी कमी दिसत असल्याचे श्री छत्रपती मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

