डोंबिवली : राज्यात सद्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. गेल्या काही महिन्यांत कोरोना वाढीचे प्रमाण आटोक्यात आल्याने जनजीवन सुरळीत झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने कडक निर्बंध लावण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन नको असल्यास कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर देखील बंदी आणली आहे. मात्र, आता डोंबिवलीतील एका वाढदिवच्या पार्टीचा किस्सा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल !
डोंबिवलीमध्ये चक्क बैलाचा जंगी वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याने पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. कोरोना काळातही अनेकांनी शाही विवाह, जंगी पार्ट्या, वाढदिवस साजरे केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. आता चक्क आपल्या लाडक्या बैलासाठीच हौश्याने जंगी सेलिब्रेशनचं नियोजन केल्याचं समोर आलं आहे.
डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर रोड परिसरात हा प्रकार घडला आहे. यावेळी नाचगाणी, फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. तर, कोरोनाच्या नियमांना हरताळ फासल्याने महाराष्ट्र कोविड कलम, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंध अधिनियमांतर्गत संबंधित बैलाच्या मालकावर विष्णूनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नितीन गडकरींवर काँग्रेसने केला कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप !
- ‘चंद्रकांतदादा तुम्ही सरकारविरोधात अविश्वास ठराव आणून दाखवाच, मग तुम्हाला समजेल…’
- १ ली ते ११ वी सगळेच पास; राज्यपालांनी दिली मान्यता
- स्वराज्याला ७५ वर्ष झाली. सुराज्य आलं का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा


