बीड : बीड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. रविवारी दिवसभरात पाण्याचा ओघ वाढत राहिल्याने रात्रीच धरण ९० टक्के भरले होते. रात्रीतून पाण्याची आवक आणखीनच वाढल्याने सोमवारी पहाटे ४ वाजता धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले. सुरुवातीला अर्ध्या मीटरने उघडलेले दरवाजे सकाळी ९ वाजता २ मीटरने वर करण्यात आले. ८७ हजार क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
माजलगाव धरणाची यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच पाणी पातळी वाढत होती. ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती. मात्र, मागील दोन दिवसांपासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. हे धरण सोमवारी पहाटे पुर्ण क्षमतेने भरले. यानंतरही धरणात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात होत आहे. यामुळे प्रशासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पहाटे घेतला.
धरणाची पाणी पातळी ४३१.८० मीटर ऐवढी आहे. शनिवारी व रविवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरण १०० टक्के भरले. यामुळे धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले. धरणात सध्या ६२ हजार ५१७ क्युसेक पाण्याची आवक आहे.
माजलगाव धरणाचे पाणी बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत असून धरणाच्या बॅकवॉटरवर शेकडो एकर शेतीला या पाण्याचा फायदा होतोय. शेतीसह बीड, माजलगाव शहरासह परिसरातील ११ खेड्यांना धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते. यावर्षीही धरण १०० टक्के भरल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
तर दुसरीकडे बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण आज सकाळी शंभर टक्के भरले असुन ते ओव्हरफ्लो झाले आहे. हे पाणी बिंदुसरा नदीपात्रात येत असून या पाणीपातळीत केव्हाही वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या व पुररेषेतील सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी ही असे आवाहन बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले
- ‘गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तरच त्यांचे जीवनमान उंचावेल’
- अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढणार; ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

