पुणे : महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या १२ जागा रिकाम्या होत आहे. कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेत १२ सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.
महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीनही पक्षांनी विधान परिषदेच्या बारा जागांपैकी प्रत्येकी ४-४ जागांचे परस्परांमध्ये वाटप केले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या कोट्यातून घटक पक्षांना एक एक जागा देणार आहे. यावर उद्या (ता. ९) होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय उद्या (ता.९) होणाऱ्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. याच वेळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या शिफारशींच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
राजभवनाचे ट्विट आले अन सगळ्यांना कळले मिलिंद नार्वेकर आहेत राज्यपालांबरोबर !
यापूर्वी शिफारस करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन जणांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डावलली होती. त्यामुळे या वेळी त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारसीवर योग्य निर्णय घेतला नाही तर सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष विकोपाला जाऊ शकतो. घटनेच्या 171(5) कलमानुसार वाङमय, विज्ञान, कला, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची राज्यपाल मंत्रिमंडळाच्या शिफारशीने नियुक्ती करतात. राज्यपाल नियुक्तीच्या सरकारच्या दोन शिफारशी राज्यपाल यांनी यापूर्वी डावलल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार कोणाची शिफारस करते, या विषयी उत्सुकता आहे.
सध्या जनार्दन चांदूरकर (कॉंग्रेस), हुस्नबानू खलिफे (कॉंग्रेस), आनंदराव पाटील (कॉंग्रेस), अनंत गाडगीळ (कॉंग्रेस), रामहरी रुपनवर (कॉंग्रेस), प्रकाश गजभिये (राष्ट्रवादी), विद्या चव्हाण (राष्ट्रवादी), ख्वाजा बेग (राष्ट्रवादी), जगन्नाथ शिंदे (राष्ट्रवादी), जोगेंद्र कवाडे (पीपल्स रिपब्लिकन) हे सदस्य शनिवारी (ता. ५) निवृत्त झाले असून दोन जणांचा कार्यकाल १५ जूनला संपणार आहे. राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते या राष्ट्रवादीच्या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापैकी राहुल नार्वेकर हे विधानसभेवर निवडून आले आहेत.
‘ग्रामपंचायतीच्या बाबतीत ‘तो’ निर्णय आम्हाला नाईलाजास्तव घ्यावा लागला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

