अहमदनगर : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. काल गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.
आज हे चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीच्या बाजूने गुजरातच्या दिशेने पुढे गेलं आहे. आज सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. एकाबाजूला खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलेआहे. दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आता हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे जात असून वाऱ्याचा वेग हा ताशी १८० किलोमीटर पर्यंत वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने तात्काळ व प्रत्यक्ष मदत करावी अशी मागणी केली आहे. ‘ही टीका-टिप्पणीची वेळ नाही. सोबत उभं राहण्याची वेळ आहे. मागच्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी राज्य सरकारने घोषित केलेली रक्कम नुकसानग्रस्तांना पोहोचली नाही. ही मदतही तुटपुंजी होती. मागच्या वर्षी वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या होत्या. यावेळी कमीत कमी नुकसान होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची आवश्यकता आहे,’ असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्या ९८ नागरिकांची कोरोना तपासणी, २ पॉझिटिव्ह!
- ‘याचा कचरा करायला शब्दच नाहीत; थर्माकोलची तलवार घेऊन मिटकरी आकाशाला खुन्नस देतोय !’
- कोरोनावर उपायकारक ‘2-डीजी’ या भारतीय औषधाचे राजनाथ सिंह यांनी केले लोकार्पण
- आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
- तौक्तेचा परिणाम, नाथसागर जलाशयात हजारो माशांचा अचानक मृत्यू!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

