मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना साथ रोखण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकरांचा समाचार घेतला आहे. ‘प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी. त्यांचं महाराष्ट्राशी नातं आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.
यासोबतच, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा अत्यंत गरजेचा असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलं आहे. मात्र राज्यातील जनतेचा लॉकडाऊनला विरोध असल्याचं सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील लॉकडाऊनला विरोध केला आहे. फडणवीसांच्या विरोधावर देखील राऊत यांनी भाष्य केलं आहे.
‘फडणवीसांचा लॉकडाऊनला राज्यात विरोध असेल. मात्र, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का?’ असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझेचा सहकारी रियाजुद्दीन काजीला NIA ने केली अटक
- ‘भाजपा विकृत मानसिकतेचा पक्ष…भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका!’
- ‘बसस्थानकाच्या श्रेयासाठी धनंजय मुंडेंचा आटापिटा’
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय?


