मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर गेल्याने कोरोना रुग्णसंख्येनुसार राज्याची तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन अश्या तीन भागात ही विभागणी असेल. यात ज्या जिल्ह्यात 15 पेक्षा अधिक रुग्ण असतील ते जिल्हे रेड झोनमध्ये असून त्या जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज झोन मध्ये असतील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्ट्यात समाविष्ट होतील. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.
त्याचप्रमाणे, भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यात केंद्र सरकारने कोरोना रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश दिले. येत्या एक दोन दिवसात केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. त्यानुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. म्हणजे या दोन झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करता येऊ शकतात. मात्र यातील जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद हे जिल्हे रेड झोनमध्ये येतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, गोंदिया हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. तर धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.
त्याचवेळी राज्यातील एकूण कोरोना रूग्णांपैकी 91 टक्के रुग्ण हे मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत. एकट्या मुंबईत 1652 पैकी 61 टक्के रुग्ण आहेत. पुण्यात 20 टक्के तर 10 टक्के रुग्ण हे ठाणे आणि पालघरमध्ये आहेत. फक्त 9 टक्के रुग्ण हे राज्याच्या अन्य भागात आहेत. त्यामुळे या भागात लॉकडाऊन अधिक कडक करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे केंद्राने काही प्रमाणात लॉक डाऊन शिथील केली तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करणे अवघड असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.


