औरंगाबाद : २२ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु झाले आहे. यामुळे तरुणांच्या उत्साहाने लसीकरणावर आलेली मरगळ झटकून लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी तब्बल १४ हजार जणांनी लस घेतली असून लस घेणाऱ्यांमध्ये १२ हजार ७६६ एवढी तरुणांची संख्या असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. गुरुवारी (दि.२४) सकाळी शहरातील अनेक केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. १८ प्लस नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादाने मनपा प्रशासनाने ७६ लसीकरण केंद्र सुरु केले असून येत्या काळात यात आणखी वाढ करणार असल्याचे आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात आले.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे २१ जूनपासून लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र राज्य सरकारने लसींची उपलब्धता विचारात घेऊन ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले होते. त्यानंतर लसींची संख्या वाढल्याने राज्य शासनाने नव्याने आदेश काढत २२ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु केले आहे. यात पहिल्याच दिवशी (दि.२३) १२ हजार २३० जणांचे लसीकरण झाले तर दुसऱ्या दिवशी १४ हजार ६७ जणांनी लस घेतली असून दोनच दिवसात २७ हजार २९७ जणांचे लसीकरण झाले आहे.
सुरुवातीला लसींची उपलब्धता नसल्याने लसीकरणाची संख्या कमी होती. त्यानंतर मात्र दुसरी लाट ओसरली आणि नागरिकांची लसीकरण करून घेण्याची इच्छा देखील नाहिशी झाली. मनपाकडे ५० हजार लसी उपलब्ध असतानाही लसीकरणाची गती मंदावली होती. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाल्याने औरंगाबादेत लसीकरणाची गती वाढत आहे.
आज लसींचा साठा मिळण्याची शक्यता
सध्या औरंगाबाद महापालिकेकडे २० हजार ४५० कोविशिल्ड तर २३० कोवॅक्सिन लसी उपलब्ध आहेत. ही संख्या शहरातील केंद्रांना आजच्या लसीकरणासाठी देण्यात आलेल्या लसी वगळून असल्याने आजच्या लसीकरणात अडचणी येणार नाहीत. आपण शासनाकडे आणखी लसींची मागणी केली आहे. आज संध्याकाळपर्यंत लसींचा साठा आपल्याला मिळू शकतो. मात्र तो किती मिळेल याबाबत सांगता येणार नाही. लसींची उपलब्धता पाहून कमी जास्त प्रमाणात हा साठा येऊ शकतो. अशी प्रतिक्रिया मनपाच्या लसीकरण अधिकारी स्मिता नळगिरकर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! नाराज जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
- ‘५१८ चित्रपटांमध्ये काम करूनही मला ओळखल नाही’ ; डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीये’ ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- बीडमध्ये शिवसेनेच्या वाघांत राडा, जिल्हाप्रमुखपदाच्या निवडीवरून दोन गटात हाणामारी
- राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका – छगन भुजबळ
- चलो बुलावा आया है…! : दौरा अर्धवट सोडून नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

