🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- राज्यात अखेरच्या टप्प्यात उद्या मतदान होणाऱ्या सर्व १७ मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेचे सध्या खासदार असले तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत हे सर्व मतदारसंघ कायम राखण्याचे युतीसमोर मोठे आव्हान आहे. युतीला धक्का देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शड्डू ठोकला आहे. परिणामी अखेरच्या टप्प्यात चुरशीच्या लढती होणार आहेत.
2014 साली उत्तर मुंबईतून पराभूत झालेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे यंदा उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांना टक्कर देणार आहेत. माजी खासदार गुरुदास कामत गटाची नाराजी आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार सुभाष पासी यांच्यामुळे होणारे मतविभाजन याचा फटका निरुपम यांना बसणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभेच्या मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने कल्याणकारी कामांच्या शिदोरीवर पुन्हा या मतदारसंघात विजयाचे निशाण फडकवण्याची तयारी केली आहे.
एका बाजूला निरुपम यांची एक फायरब्रांड नेते म्हणून ओळख आहे तर गजानन कीर्तीकर यांची प्रतिमा काम करणारे खासदार अशी आहे.या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्य लक्षणीय आहे. त्यामुळे ही मतं कुणाच्या बाजूने झुकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


