नगर : सोनई येथून जवळच असलेल्या बेल्हेकरवाडी येथील शेतातील झाडाला पायात गुंतलेली साखळी अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.परीसरातील ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बेल्हेकरवाडी-होनवस्ती रस्त्यावरील ज्ञानदेव बेल्हेकर व अप्पासाहेब निमसे यांच्या शेतबांधावर असलेल्या जांभळाच्या झाडावर शेतकरी पांडूरंग बेल्हेकर यांनी झाडावर लटकलेला मृत अवस्थेतील बिबट्या पाहिला.त्यांनी तातडीने विनायक व अप्पासाहेब निमसे यांना माहिती देवून वनविभागास खबर दिली.ही बातमी समजताच बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली.
वनपाल दशरथ झिजुर्डे, वनरक्षक सय्यद, गाडे व वनमजूर ढेरे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. बिबट्या रात्री जवळच खटकीत अडकला असावा.तेथून हिसका देवून लोंखडी खटकी व लांब साखळीसह तो सुरक्षा म्हणून झाडावर चढला मात्र झाडाच्या फांदीला मागच्या पायात असलेली साखळी अडकून तो उलटा झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनपाल यांनी व्यक्त केला.
हेही पहा –


