🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करत आहोत. पण त्या (50 खोके) घोषणा शिंदे गटाच्या आमदारांना झोंबल्या. मी अनेक वर्षे विधिमंडळात काम करत आहे, आम्ही सत्तेवर असतानाही विरोधी पक्ष इथे येऊन घोषणा द्यायचा पण आम्ही कधी त्यांना अडवलेले नाही. आम्ही दिलेल्या घोषणांमुळे जनमानसामध्ये आपली प्रतिमा मलीन होत असल्याची शंका शिंदे गटाच्या लोकांना आली आणि आज जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांतर्फे इथे आंदोलन केले गेले, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. मराठी भाषेत म्हणतात त्याप्रमाणे चोराच्या मनात चांदणं असा प्रकार घडला, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.
वास्तविक उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ओला दुष्काळ जाहीर न करता काल शेतकऱ्यांच्या तोंडाला ज्याप्रकारे पाने पुसण्यात आली त्यावर एकंदरीतच या घोषणा होत्या. पण त्यातील ५० खोके, एकदम ओके ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली, ते नाराज झालेले दिसत आहेत. वास्तविक विधिमंडळात अशा गोष्टी घडत असतात, पण सत्ताधाऱ्यांच्या वागण्यातून दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्याचे निष्पन्न झाले आहे, असे अजित पवार म्हणाले.
अमोल मिटकरी यांनी सांगितला घटनाक्रम-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मविआमधील नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतर नेते उपस्थित होते. त्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज सकाळी १०.३० वाजता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याचे ठरले होते, अशी माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी घडलेला घटनाक्रम सविस्तर विशद केला.
आम्ही ‘५० खोके, एकदम ओक्के’ ही घोषणा दिली-
आम्ही १०.३० वाजता आम्ही पायऱ्यांवर पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आंदोलन करायला आलो. मात्र तिथे सत्ताधारीदेखील आंदोलन करत होते. आम्ही त्यांच्यापासून दूर आंदोलन करण्यास सुरुवात केली. आम्ही ‘५० खोके, एकदम ओक्के’ ही घोषणा दिली आणि ती सत्ताधाऱ्यांच्या वर्मी लागली. आमच्या पक्षातील नेते अनिल भाईदास पाटील यांनी गाजराचा हार गळ्यात घालून शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवण्याचे काम सरकार करत असल्याची घोषणाबाजी केली. मात्र त्यानंतर सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आम्हाला धक्काबुक्की करुन पत्रकारांच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न झाला. भाजप आमदारांनी आम्हाला आई-बहिणीवरुन शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच शिंदे गटाच्या आमदारांनी मीडियाला अधिकृत बाईट देऊन कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ, अशाप्रकारची धमकीवजा भाषा वापरली.
आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहोत-
आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहोत, त्यांच्या आत्महत्येचा जाब विचारत आहोत. ओला दुष्काळ कधी जाहीर करणार अशी मागणी करत आहोत. याचा सरकारला राग का यावा? आमची सत्ता असताना त्यांनी दाऊदच्या नावाने घोषणा दिल्या होत्या. पण आम्ही त्यावेळी संयम राखत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, असे मिटकरी म्हणाले.
सत्ताधाऱ्यांनी विकृतीचे प्रदर्शन केले –
या गोंधळानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आम्हाला आत येण्याचे निर्देश दिले. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सत्ताधारी आमदारांना समज देण्यास सांगितले. आज झालेला प्रकार अतिशय चुकीचा असून आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी विकृतीचे प्रदर्शन केले तर आम्ही शांतीचे प्रतिक दाखवून दिले, असे अमोल मिटकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | “विचारांची लढाई विचारांनी लढावी…”, विधान भवनाबाहेरील प्रकरणावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रीया
- Amol Mitkari | विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं? अमोल मिटकरींनी सांगिताला संपूर्ण घटनाक्रम
- Sushma Andhare | “विधान भवनाबाहेर जे काही झालं ते भाजप पक्षाचा एक इव्हेंट होता”, – सुषमा अंधारे
- Vikram Vedha । हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत ‘विक्रम वेधा’चा टीझर प्रदर्शित
- Assembly Session 2022 | “ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है” ; धक्काबुक्की झाल्याच्या प्रकारावर भरत गोगावलेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
