लक्ष्मण हाके : उषाबाई सुबराव सरगर, गाव तळेवाडी ता आटपाडी, वय ४५ च्या पुढे, संघर्ष चालू आहे जीवनाचा, पोटाच खळग कसं भरता येईल या प्रश्नाने यांचा दिवस सुरू होतो आणि अंगभर मेहनत करून संपतो. ही आहे माणदेशी रणरागिणी, जसं लग्नाचं बाशिंग बांधलं तेव्हापासून ती उसतोडीला जाते. कोवळ्या वयात लग्न झालेलं त्याच वर्षी उसाची उचल घेतलेली, हळदीच्या अंगाने उसतोडीच्या वावरात यांचा सुखाचा संसार फुलला. दोन मुली आणि एक मुलगा, दोन मुलींची लग्न झाली. एक मुलगा फक्त दुसरी शाळा शिकला. आज ही उषाबाई ऊस तोडत आहेत,अनेक वर्षे झाली, यांच्या हातातला कोयता सुटला नाही.
माणदेश परिसर दुष्काळी भाग, दर पाच वर्षांनी इथे दुष्काळ पडतो. इथल्या लोकांचे जीवन म्हणजे पशुधन,गाई गुरे ,यांच्यावर अवलंबून, दुष्काळाचे चटके सहन करता करता यांच्या मनावर उन्हाच्या डागण्या आपोआपच बसल्या. आलेल्या संकटाला या माणदेशी बाया मोठ्या धीराने सामोऱ्या जातात. पश्चिम महाराष्ट्रातला १३ तालुक्यांचा भाग दुष्काळी भाग म्हणून गणला जातो. आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत भागातील ही लोकं उसतोडीला नदीकाठच्या भागात स्थलांतरित होतात. गाव सोडून कृष्णा कोयनेच्या काठावर येतात, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो पण या माझ्या ऊसतोडणी करणाऱ्या बायांच्या अनेक जीवन मरणाच्या समस्या आहेत. पहाटे पाच वाजता यांचा दिवस सुरू होतो, रात्री दहा ला संपतो. दिवसभराची रोजनदारी नवरा बायको ला पाचशे रुपये पडते. दीड लाख रुपयांची उचल यांना हंगामात कधीच फिटत नाही, मग हे ऊसतोडणी मजूर, मुकादम कारखान्याच्या दुष्टचक्रात सापडतात. नक्की उषा बाईची संसाराची गाडी या उसतोडीच्या चक्रात सापडली आहे. तिच्या म्हणून काही समस्या आहेत, पोटच्या दोन पोरी थोड्या मोठ्या झाल्या लग्न करून सासरी गेल्या, मुलगा बिरुदेव उसतोडीला आलाय.
आज तिचं वय वर्षं ४५ च्या पुढं आहे. तिच्या कष्टाला दाम मिळत नाही. तिच्या आरोग्य समस्या ती निमूटपणे सहन करतेय. तडजोडीला तिनं आपलं मानलय, जनावरांच् पोट भरल की आपलं पोट भरलं असं तिचं साधं गणित आहे. आज महिला दिन साजरा होत आहे. तिला या गोष्टीची कल्पना असेल का ?
देशाला आझादी मिळून ७४ वर्षे झाली. ऊसतोड कामगार महिलेचे काय प्रश्न असू शकतात याचा कधी विचार झाला असेल का ? राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी भांडतात, शरद पवार कारखानदार लॉबी साठी कसब पणाला लावतात, ऊसतोड कामगारांसाठी कोणी वाली मिळेल का ?
स्रियांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या लढाऊ बायांचं लक्ष या ऊसतोडणी करणाऱ्या बायांकडे जाईल का ? एखाद्या साखर शाळेमुळे यांची पुढची पिढी शिकेल का ? उसाच्या फडावर एखादी शासनाची महिला आरोग्य तपासणारी, काही साधनं देणारी एखादी योजना शासनाकडून राबवली जाईल का ? असे एक ना अनेक प्रश्न उराशी बाळगून उषाबाई सरगर सारख्या असंख्य बाया आहेत. बिचाऱ्या, झगडणाऱ्या, पण निसर्गाला त्या शरण गेल्या नाहीत उलट येणाऱ्या प्रत्येक अडचणीशी त्या मुकाबला करतात.
या महिला दिनाच्या निमित्ताने एक आवाहन करतो, महाराष्ट्रातल्या आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांना, बाबांनो आमचा माणदेशी माणूस कधी आत्महत्या करत नाही, येणाऱ्या संकटाला तो धीराने सामोरा जातो, जबाबदारीने सांगतोय, महिला दिनाच्या शुभेच्छा या ऊसतोड महिलेला देतोय, तिचा आत्मविश्वास बळकट व्हावा, व्यवस्थेनं तिच्याकडं थोडं पहावं म्हणून हा लेखन प्रपंच.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

