🕒 1 min read
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणबी सेनेला घटक पक्षाचा दर्जा देऊन समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे आम्ही महायुतीसोबत निवडणूक लढवणार आहोत; मात्र युती तुटल्यास भाजपसोबत जाणार असल्याचे कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी स्पष्ट केले. औरंगाबादेत शुक्रवारी (ता. 27) ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणबी संघटनेने एकत्रित येत औरंगाबादेत बैठक घेतली. त्यानंतर पाटील म्हणाले, राज्यातील 120 जागांवर कुणबी समाजाचा प्रभाव आहे. त्यामुळे महायुतीकडे आम्ही 20 जागांची मागणी करीत आहोत. पुढील आठवड्यात याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. महाराष्ट्र कुणबी समाज विकास मंडळ उस्मानाबाद, अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ नांदेड, कुणबी मराठा संघटना वसमत, कुणबी सेना गंगाखेड, पुरोगामी मराठा संघटना, सक्रिय कुणबी समाज मंडळ मालाड मुंबई, कुणबी विकास मंडळ सांताक्रुझ मुंबई, कुणबी समाजातील मंडळ यवतमाळ, कुणबी युवा संघ जालना, कुणबी महासंघ नागपूर, कुणबी सेना खानदेश या संघटना सोबत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
राजकारणाशिवाय संपूर्ण कर्जमाफी करावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, कुणबी महामंडळ करावे, सिंचन व्यवस्थेला बळ देऊन शेतकरी सक्षम करावा, कुणबी असताना प्रमाणपत्र न देणाऱ्यांना चाप लावावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेला स्नेहबंधचे बी. बी. पाटील, लातूरच्या कुणबी समाजोन्नती मंडळाचे भागवत धायगुडे, अखिल भारतीय कुणबी मराठा संघटनेचे मनीष वडजे, कुणबी युवा सेनेचे ऍड. राम कुऱ्हाडे, कुणबी संघटनेचे दत्ता इंगळे यांची उपस्थिती होती.
मराठ्यांसारखा हवा स्वतंत्र दर्जा
कुणबींना ओबीसींच्या 388 जातिसमूहातून नव्हे, तर स्वतंत्र आरक्षण द्यावे. यावेळी ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आमच्या वाट्याचे आरक्षण द्यावे. ज्या जातीची लोकसंख्या कमी असताना त्यांना मोठा लाभ होत आहे. मराठा 12 टक्के असताना त्यांना तेवढेच आरक्षण मिळत आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही; पण आमची ओबीसीत 30 टक्के संख्या आहे. तेवढे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी मागणीही विश्वनाथ पाटील यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1177941425981292546?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177949316888981505?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
