टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले आणि युती सरकारचे नवे कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर हे बीडच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर क्षीरसागर हे दौऱ्यावर असताना हार – तुरे स्वीकारणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे
राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शनिवार २२ रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर असून दोन दिवस विविध कार्यक्रम व आढावा बैठक घेतील. ज्या जनतेने कठीण प्रसंगात भक्कम साथ दिली, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन मिळालेल्या संधीचा उपयोग जनतेसाठी करणार आहेत.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता हा दौरा केवळ दुष्काळ निवारणार्थ असून कार्यकर्त्यांनी कुठलेही हार तुरे किंवा स्वागत समारंभ ठेऊ नयेत त्याऐवजी त्या पैशाचा उपयोग दुष्काळ ग्रस्तांसाठी करावा, असे आवाहन भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात भीषण दुष्काळ असल्याने अनेक नेते दुष्काळी दौऱ्यावर जात आहेत. त्यावेळी स्थानिक नेत्यांकडून आणि गावकाऱ्यांकडून नेत्यांचे हार तुरे देऊन जंगी स्वागत केले जाते. हार तुऱ्यांवर खर्च होणार पैसा हा व्यर्थ जातो. त्यामुळे आता नेत्यांकडून जनतेला हे खर्चिक मानपान नको असे आवाहन केले जाते. याआधी देखील भाजप नेते सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ही दुष्काळ दौऱ्यावर मान पान स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

