🕒 1 min read
मुंबई : मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला होता. पुतळा हटवण्यास असलेला विरोध लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने रातोरात बुल्डोझर चालवून चौथरा उद्ध्वस्त केला. त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आणि स्थानिक युवकांनी नागपूर-छिंदवाडा महामार्ग काहीकाळ अडवून धरला होता.
काँग्रेसच्या राज्यात सावरकरांनंतर आता शिवरायांचा अवमान होत आहे असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा व्हीडीओ शेअर केला आहे.

काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात सत्तास्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रणित सरकारला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंग चौहान यांनी टीका करत प्रश्न विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद मध्य प्रदेशात आता चांगलाच पेटला आहे आणि त्याचे लोणं आता महाराष्ट्रातही येतील अशी चिन्ह आहे.
याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे. तसेच मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापिही सहन करू शकत नसल्याचंही संभाजीराजेंनी अधोरेखित केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
