मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये २० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये तब्बल २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे दरड कोसळणे, अनेक भागांमध्ये पाणी तुंबणे अशा घटना घडल्या आहेत. दुर्घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला.
त्याचप्रमाणे जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, रात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली.
दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
तसेच ही एक नैसर्गिक घटना जरी असली, तरी एवढा पाऊस पडणं अनैसर्गिक आहे. मुंबईत काल रात्री झालेला पाऊस भितीदायक होता. समुद्र किनाऱ्यावरील भागांना धोका जास्त असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसंच येथे डोंगरावर राहत असलेल्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पटोलेंच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
- ‘पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आलीये!’, आठवलेंनी दिले राज्यात सत्ता स्थापनेचे निमंत्रण
- ओवैसींच्या एमआयएम पक्षांचे ट्विटर अकाउंट हॅक, ‘या’ व्यक्तीचा फोटो पोस्ट केल्याने कार्यकर्ते गोंधळले
- ‘या लबाड कोल्ह्याने औकात पाहून वक्तव्य करावं’, आढळराव पाटलांचा हल्लाबोल
- ‘धाकड’चे शूटिंग पूर्ण होताच अर्जुनने शेअर केली भावूक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

