🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: मुघल त्यांच्या जिवंतपणी स्वराज्याचे काही बिघडू शकले नाही मग हे पुतळा हटवण्याचा प्रयत्न करणारे आजचे कमलनाथ किस झाड की पत्ती आहेत? काँग्रेस या संतापजनक घटनेचे समर्थन करत आहे का? छत्रपती शिवाजी महाराज राज्यासह देशाचे दैवत आहेत. त्यांच्याबाबत अपमानास्पद असे वर्तन शिवप्रेमी कदापिही सहन करणार नाहीत. काँग्रेसचे राज्य सरकार हे असे वर्तन करण्यास स्वतःचा मोठेपणा समजत असेल तर त्यांना हा देश माफ करणार नाही.अशी जळजळीत प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बुलडोजरने काढल्यावर शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले आहे.
त्याच बरोबर मेटे पुढे म्हणाले की ‘काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माफी मागून हा महाराजांचा पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा स्थापित करावा अन्यथा काँग्रेसला महाराष्ट्र अन् देशभरातील शिवभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. शिवद्रोही मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या अहंकारी सत्तेला पालथे करण्याचे काम आता यापुढे देशभरातील शिवप्रेमी नक्की करणार आहेत.
मध्य प्रदेशात सौंसर नगरपालिकेनं ही पुतळा हटवण्याची कारवाई केली. सौंसर शहरातल्या एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून तरुणांकडून होत होती. त्यासाठी शहरातल्या एका युवा संघटनेनं शिवाजी महाराजांचा पुतळाही तयार केला होता.चौकात एक दगडी चौथरा उभारून त्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. महाराजांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी स्थापित करण्यात आला होता. या चौथऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, असं कारण देत नगरपालिकेनं या पुतळ्याला परवानगी नाकारली.
दिवसा कारवाई केली तर लोकांचा रोष होईल. हे लक्षात घेत नगरपालिकेनं रातोरात हा पुतळा पाडण्याचा निर्णय घेतला. बुल्डोझर मागवून रात्रीच चौथरा उद्ध्वस्त करण्याची कारवाई करण्यात आली. हे लक्षात येताच लोक रस्त्यावर उतरले. छिंदवाडा -नागपूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. हा पुतळा पुन्हा तिथेच उभा करावा आणि लवकरात लवकर हे काम करावं अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान शिवराजसिंह चौहान यांनी केलेल्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातही याविषयी चर्चा सुरू आहे. ‘शिवरायांना आदर्श मानणारं ठाकरे सरकार काँग्रेसला बरोबर घेऊन सत्तेत आहे. त्यांना शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन कसा होतो’, असा तिखट सवाल शिवराज सिंह यांनी केला आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेसचं कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या प्रकाराची दखल घ्यावी आणि कमलनाथ यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी अशीही मागणी शिवराज सिंह यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
