🕒 1 min read
मुंबई : संथ खेळपट्टीवर फलंदाजीत आलेले अपयश आणि संघाचे बिघडलेले संतुलन चेन्नई सुपर किंग्जच्या झोळीत अजून एक पराभव टाकून गेले. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नईचा ८ गड्यांनी सहज पराभव केला आणि आपल्या विजयाचे खाते उघडले. गोलंदाजांना पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर चेन्नईने हैदराबादला १५५ धावांचे आव्हान दिले होते, प्रत्युत्तरात अभिषेक शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने १७.४ षटकातच हे लक्ष्य गाठले.
हैदराबादचा डाव
युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि कप्तान केन विल्यमसन यांनी हैदराबादला उत्तम सुरुवात करून दिली. संथ खेळपट्टीवर रुळेपर्यंत दोघांनी संयमी फलंदाजी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८९ धावा जोडल्या. वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने विल्यमसनला बाद करत चेन्नईला पहिले परंतु उशिरा यश मिळवून दिले. विल्यमसनने ३२ धावा केल्या. अभिषेकने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला पहिल्यावहिल्या विजेतेपदाकडे पोहोचवले. विल्यमसननंतर मैदानात आलेल्या राहुल त्रिपाठीने आक्रमक फटकेबाजी केली. १८व्या षटकात अभिषेक बाद झाला. त्याने ५ चौकार आणि ३ षटकारासह ७५ धावांची खेळी केली. याच षटकात हैदराबादने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्रिपाठीने १५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या.
चेन्नईचा डाव
रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईसाठी सलामी दिली. दबावात खेळणाऱ्या उथप्पाला (१५) वॉशिंग्टन सुंदरने जाळ्यात अडकवले. तर ऋतुराजला (१६) टी. नटराजनने तंबूत धा़डले. पॉवरप्लेमध्ये संकटात सापडलेल्या चेन्नईला अंबाती रायुडू आणि मोईन अली यांनी बाहेर काढले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. सुंदरने रायुडूला बाद करत ही भागीदारी मोडली. रायुडूने २७ धावा केल्या. रायुडूपाठोपाठ मोईन अलीही बाद झाला. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या. धोनी, शिवम दुबे स्वस्तात बाद झाल्यानंतर कप्तान जडेजाने फटकेबाजी केली. २० षटकात चेन्नईने हैदराबादसमोर ७ बाद १५४ धावा केल्या. जडेजाने २ चौकार आणि एका षटकारासह २३ धावांची खेळी केली. हैदराबादकडून सुंदर आणि नटराजन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही पण…”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
- आंदोलनाच्याआधी शरद पवारांच्या घराची रेकी, पोलिसांनी केले मोबाइल जप्त
- “हो, आमची भाषा तशीच असेल पण तुमच्या…”- संजय राऊत
- “आज जर अशी घटना घडली तर…”, चहलला १५व्या मजल्यावरून लटकवणाऱ्या खेळाडूवर शास्त्री संतापले!
- ‘त्या’ घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया; म्हणाले,“सुरक्षेतील त्रुटींची…”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
