पुणे : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
कोरोनावर जर मात करायची असेल तर देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. आजपासून देशात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तर, जनतेला आर्थिक अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने मोफत लसीकरण करण्याचे ठरवले आहे. मात्र, लसींचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने राज्यात आजपासून लसीकरण करण्यास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असमर्थता दर्शवली आहे.
अनेक राज्यांमधील अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे हे लसीकरण थोडं लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. परंतु लस उत्पादक कंपन्यांवरही काही मर्यादा आहेत. यादरम्यान, कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी आता देशाच्या बाहेरही लस उत्पादन करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
पुढील सहा महिन्यांमध्ये सीरम आपल्या लसींच्या उत्पादनाची क्षमता वर्षाला २.५ ते ३ अब्ज डोस इतकी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान भारतात गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा
- क्लीन बोल्ड करणाऱ्या नवोदीत हरप्रीत ब्रारला भेटायला गेला कोहली; व्हिडीओ व्हायरल
- ‘अद्यापही बहुतांश दुर्बल घटकांच्या बँक खात्यात जाहीर आर्थिक सहाय्यता निधी जमा झालेला नाही’
- पंजाबकडून रवी बिश्नोईने घेतला पुन्हा एकदा नेत्रदीपक झेल; व्हिडीओ व्हायरल
- नागरिकांना लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत मदत करा; पटोलेंचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन


