मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार नसून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी मंत्र्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलेली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘नाना पटोलेंच्या रुपाने महाराष्ट्रात एका पक्षाला विनोदी कलाकार अध्यक्ष लाभले आहेत. ते अनेक विनोद करीत असतात. त्यांच्या आजपर्यंत झालेल्या कोणत्याही पत्रकार परिषदेचे विषय मोदी, मोदी आणि मोदी आहेत. मग आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या विषयी बोलले तर तुम्हाला राग का येतो? त्यामुळे नाना पटोले हे विनोदी कलावंत आहेत त्यांना गांभीर्याने घ्यायचे कारण नाही.’ असा मार्मिक टोला त्यांनी येवेली लगावला आहे.
तसेच ‘महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु आहे. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नाहीत. आता कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता राज्यपालांना निवेदन दिले. ही मराठा समाजाची दिशाभूल आहे. मुख्यमंत्री महोदय समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका,’ अशा शब्दात आशिष शेलार यांनी आघाडी सरकारच्या कारभाराचा समाचार यावेळी घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गावागावांतील सौरऊर्जावरील पथदिवे निघाले भंगारात, प्रशासनाची उदासीनता आली समोर
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…


