मुंबई:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. ९ डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, दिल्ली-पंजाबमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकात शेतकरी कमी आणि दलालच जास्त आहेत. त्यामुळे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्यात शेतकरी हितापेक्षा बाजार समितीतील दलाल व इतर घटकांच्याच हिताचा जास्त विचार केला आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर काल सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महाएल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून अखेरीस शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. या कायद्यामुळे शेतमालाच्या विक्रीसाठी जागेचे बंधन नसेल. शेतीविषयक करारांमुळे मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार असेल. बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित राहणार आहे. करारांसाठी स्वतंत्र लवाद असणार आहे. या कायद्यांचे सार म्हणजे परकीय क्षेत्रातील गुंतवणूक शेती व्यवस्थेत वाढेल. यातून तंत्रज्ञानाधारित शेतीस चालना मिळून उत्पादकताही वाढीस लागणार आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे.
केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- हार्दिक पंड्याची नव्हे तर ‘या’ खेळाडूची कामगिरी सामना जिंकवून देणारी : मूडी
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ

