जुन्नर – वादळी पावसाने वीजेचा सिमेंटचा पोल शेतात पडला.. या शेतात पडलेल्या वीजेच्या ताराचा स्पर्श होऊन तालुक्यातील बोरी खुर्द येथील पठाडेमळा येथील बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडताना मालकाला वीजेचा धक्का लागू नये म्हणून चक्क कुत्र्याने वीजवाहक तार तोंडात धरली, ओढली.. मात्र कुत्र्याची मालकाप्रतीची कृतज्ञता ना मालकाला वाचवू शकली, ना मालकांच्या वडीलांना… यात कुत्र्याचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरी खुर्द येथील पठाडेमळा येथील यादव भिमाजी पटाडे (वय ६५ वर्षे) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे ( वय ३५) हे दोघे सकाळी शेतात औषध फवारणीसाठी गेले होते. त्यांच्यासमवेत त्यांचा पाळीव कुत्राही शेतात पोचला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी वादळी पावसाने शेतातील वीजेचा सिमेंटचा पोल पडला. यात वीजवहन सुरूच होते. शेतात पडलेल्या विजेच्या तारांमध्ये वीजप्रवाह उतरून यादव भिमाजी पटाडे व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे या दोघा पिता पुत्रांचा करुण अंत झाला.
दरम्यान, या पिता-पुत्रांना विजेचा धक्का लागत असताना जवळ असणारा त्यांचा पाळीव कुत्रा त्या ठिकाणी होता. त्यानेही प्राणाची बाजी लावात आपल्या मालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याने या दोघांना वाचविण्यासाठी तोंडात विजेची तार धरून दूर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या मालकाला वाचवण्यात कुत्र्याला अपयश आलेच मात्र स्वत:चा जीव सुद्धा त्याला गमवावा लागला.
या घटनेने परिसरात सर्वांनाच धक्का बसला. वादळी पावसाने जुन्नर तालुक्यात दोघांचा बळी घेतला. त्याचबरोबर कुत्र्याच्या शेवटपर्यंत दाखवलेल्या इमानदारीचीही चर्चा गावात व परिसरात सुरू होती. दरम्यान महावितरणवर ग्रामस्थ संतप्त झाले असून महावितरणच्या कारभारावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, महावितरणचे कोणते अधिकारी अथवा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. या वेळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता थोड्याच वेळात पोहचतो, असे सांगून या प्रकाराकडे टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एसटी’चे प्रशिक्षण पूर्ण मात्र सेवेत घेण्यास टाळाटाळ; उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण!
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप


