मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याला जाण्याचे जाहीर केल्यानंतर यावर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेतेही टीका करत असताना पाहायला मिळत आहेत. मनसे आणि शिवसेना एकमेकांवर करत असलेले आरोप प्रत्यारोपही पाहायला मिळत आहेत. आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा टोला लगावला आहे.
भाजप नेते आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा अजूनही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध आहे. राज ठाकरे यांनी माफी मागावी, मगच अयोध्येला यावे, या भूमिकेवर बृजभूषण सिंह ठाम आहेत. असे असतानाही मनसेकडून अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांची नावनोंदणी, रेल्वे आरक्षण या गोष्टींना सुरुवात करण्यात आली आहे. असे असतानाच दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर टीका केली आहे. “भीती वाट असेल, तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला येऊ शकता”, असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.
ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटा चे राजकारण काय शिकवणार, जर भिती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. आदित्य साहेबांना विनंती करून सोबत येऊ शकता,माफी मागण्याची गरज लागणार नाही. जय श्रीराम. @mnsadhikrut @RajThackeray @ShivSena @TV9Marathi
— Deepali Sayed (@deepalisayed) May 17, 2022
“ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटाचे राजकारण काय शिकवणार, जर भीती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. आदित्य ठाकरेंना विनंती करून सोबत येऊ शकता, माफी मागण्याची गरज लागणार नाही”, असा टोला दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंना लगावला आहे. यापूर्वी राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेवरून दीपाली सय्यद यांनी “सभा करायच्याच असतील तर आयोध्येत करून दाखवा पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून”, अशी टीका दीपाली सय्यद यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या –

