🕒 1 min read
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात काल गुरुवारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी या काश्मिरी पंडिताच्या हत्येवरून मोदी सरकारवर टीका केली. अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले होते. राहुल भट या तरुणाच्या हत्येनंतर आता फारूख अब्दुल्ला यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने काश्मीर फाईल्स या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाले, “काश्मीर फाईल्स हा सिनेमा सत्यावर आधारित आहे का? असा प्रश्न मी सरकारला विचारला होता. खरंच एखादा मुस्लीम आधी एखाद्या हिंदूला मारेल आणि नंतर त्याचं रक्त भातात टाकून तो भात पत्नीला खायला देईल का? आम्ही इतक्या खालच्या पातळीवर घसरलो आहोत का?” असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काश्मीर फाईल्स या निराधार सिनेमाने देशात केवळ द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, अजूनही या सिनेमावर वाद निर्माण होत आहेत. काही महिन्यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपने जोरदार समर्थन केलं होतं. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी हा सिनेमा एका विशिष्ट धर्माला टार्गेट करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, असे सांगत टीका केली होती. अशातच आता फारूख अब्दुल्ला यांनी बंदी घालण्याची मागणी केली असल्याने हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
